कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी : म.ज्यो.फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग
ग्रामीण भागात राहणारे अनेक व्यक्ती रोगाचे निदान न होऊ शकल्याने किंवा लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाची जोड करू न शकल्याने आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. पुढे तो दुर्धर बनतो आणि रुग्णाचा अंत होतो. याविषयी जनजागृती व्हावी आणि गरजू व्यक्तींना उपचारासाठी योग्य ते सहकार्य करता यावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे संस्थापक आ.कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर यांच्या वतीने आज (दि. १७ ऑगस्ट) सगरोळी येथील माणिकप्रभू मठात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सगरोळी व परिसरातील १०३ महिला, ९ बालके यासह ३२७ हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वसाधारण आजारासह कान, नाक, घसा, अस्थिरोग, कर्करोग, बालरोग आदी रुग्णांनी याचा लाभ घेतला. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, अपेक्षा क्रिटीकल केअर व मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल नांदेड, नंदीग्राम हॉस्पिटल नांदेड व लोटस हॉस्पिटल नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांनी यात सहभाग घेतला. शिबिरात रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात आली व गरजेनुसार पुढील तपासणी तसेच उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला.